आपला जिल्हाताज्या घडामोडी

सेवापूर्ती निमित्त मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांचा गौरव 

संपादक : सुखदेव भोरडे

 

प्रतिनिधीः-आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर विद्यालयातील मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांचा धर्मपत्नी प्रा.डॉ.अश्विनी घोगरे- कोलते यांचे समवेत तसेच सेवानिवृत्त सेवक भीमराव निकाळजे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ नुकताच पार पडला. ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी केलेल्या विविध शाखातील शैक्षणिक कार्याबद्दल संस्था तसेच आष्टापूर, भवरापूर,बिवरी, गोतेमळा, शिरसवडी, हिंगणगाव, जगतापवाडी,  देवकरवडी, वाडेबोलाई ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून सुवर्णमुद्रा देऊन गौरव करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून सनई चौघड्याच्या गजरात सरांना सभास्थळी आणले. सेवापूर्तीच्या निमित्ताने राहुल कोतवाल यांनी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण केले.ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या मदतीतून बांधलेल्या सभगृहाचे या वेळी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी घोगरे सरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी माजी विद्यार्थी नवनाथ जगताप यांनी संपादित केलेल्या ‘ध्येयवादी शिक्षणकर्मी’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन व कलाशिक्षक राजेंद्र दळवी यांनी रेखाटलेल्या सरांच्या तैल चित्राचे अनावरण करण्यात आले. शिवाजी घोगरे यांच्या सेवेची सुरुवात त्यांच्याच गावात दौंडज येथून झाली. दौंडज येथील शिक्षण महर्षी डॉ.पतंगराव कदम विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात थोर सामाजिक कार्यकर्ते दगडोबादादा जाधव यांच्याबरोबर त्यांनी काम केले. हे विद्यालय सुरू झाले त्यावेळी शिवाजी घोगरे हेच शिक्षक होते. तदनंतर १९९३ पासून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान या संस्थेत रुजू होऊन मुख्याध्यापक म्हणून पिंपळे विद्यालयात कार्याला सुरुवात केली. विनाअनुदानित तत्वावर काम करून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच या ठिकाणी विद्यालयाच्या इमारतीची उभारणी केली. पिंपळे या विद्यालयाबरोबरच जेऊर विद्यालयातही त्यांनी गुणवत्ता पूर्ण काम केले.२००५ मध्ये अष्टापुर तालुका हवेली येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात त्यांची बदली झाली. या विद्यालयात त्यांनी पंधरा वर्ष सेवा केली. या 15 वर्षात विद्यालयाच्या गुणवत्तेत भर घालण्याचे काम त्यांनी केले. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा पुरवण्यापासून ते विद्यालय डिजिटल करण्यापर्यंतच त्यांचा सर्व प्रवास ग्रामस्थांनी पाहिला. पूर्व हवेलीमध्ये हे विद्यालय आदर्श विद्यालय म्हणून तसेच घोगरे सरांची शाळा म्हणून ओळखले जाऊ लागले. या विद्यालयातून अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांनी केले. एक प्रामाणिक शिक्षक समाज घडवू शकतो. महात्मा गांधी हे एका शिक्षकामुळेच घडले. त्यामुळे समाज घडवण्याचे काम शिक्षकांकडून होते. असेच कार्य शिवाजी घोगरे यांनी आपल्या सेवा काळात केले असे गौरवउद्गार समारंभाचे अध्यक्ष व आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा कोलते यांनी घोगरे सरांच्या प्रामाणिक सेवेबद्दल काढले. त्यांच्या कामाची दखल घेऊन सेवानिवृत्त झाल्यानंतर सरांचे संस्थेच्या सहसचिव पदी निवड केल्याचे त्यांनी जाहीर केले. माध्यमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत एकत्र राहिलेले घोगरे सरांचे मित्र व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सरांच्या समवेत विद्यार्थी दशेतील अनुभव सांगताना माध्यमिक स्तरापासूनचा प्रवास आम्ही एकत्र कसा केला, गरिबीमुळे वेळ प्रसंगी अर्धंपोटी राहिलो पण शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही. वस्तीगृहात पैसे वाचवण्यासाठी कशी कसरत केली हे अनुभव सांगितले. आज आम्ही आर्थिक , कौटुंबिक, सामाजिक स्थैर्य प्राप्त केले असले तरी या पाठीमागचा संघर्ष आम्ही भोगलेला आहे. याची आठवण सर्वांना करून दिली. घोगरे सरांनी पिंपळे, जेऊर या विद्यालयात काम करताना ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. अष्टापुर विद्यालयात श्रीहरीदादा कोतवाल यांनी तत्कालीन गाव पुढार्‍यांच्या मदतीने पायाभरणी केलेल्या या विद्यालयावर कळस उभारण्याचे काम गावातील तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गावचे माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य सुभाषआप्पा जगताप यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमामुळेच हे विद्यालय नावारुपाला आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप,संचालक शामराव कोतवाल, ताराचंद कोतवाल, कुंडलिक थोरात, महादेव कांचन, सरपंच पुष्पाताई कोतवाल, सुनीता कोलते,शांताराम पोमण, शशिकला कोलते, बंडूकाका जगताप, गौरव कोलते,ॲड. प्रकाश खाडे, ॲड. कलाताई फडतरे,डॉ. सुभाष तळेकर, शंकरदादा बाठे, जगन्नाथ झेंडे, पंडित साबळे,शिवाजी कोलते,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, वसंत ताकवले, सुधाकर जगदाळे, कुंडलिक मेमाणे,भगवंत बेंद्रे, विश्वास चव्हाण, सतीश पाटील,बिभीषण जाधव,अर्जुन कड विद्यालयाचे माजी विद्यार्थी सोनुल कोतवाल, मोनिका कोतवाल, संदीप पोमण,राहुल दाते, सचिन निकाळजे उपस्थित होते. शाळा समिती सदस्य नितीन मेमाणे, तयाजीबापू जगताप,विजय कोतवाल, मुख्याध्यापक सुनील जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शांताराम पोमण यांनी, सूत्रसंचालन जितेंद्र देवकर व बाळासाहेब ढवळे यांनी तर उपस्थितांचे आभार संदीप कोतवाल यांनी मांनले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.