पुणे, प्रतिनिधी : ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पाळत पुण्यातील संतोष ओसवाल व टीम सहायता यांनी मनपा शाळा अनाजीवस्ती येथील विद्यार्थ्यांना संगणक संच भेट दिला आहे.
डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करताना शाळेला संगणक संच देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत आज संगणक संच औपचारिकरित्या शाळेला सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्यातील अडचणी मोठ्या प्रमाणात दूर झाल्या आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची इच्छा लक्षात घेऊन शिक्षक बबन सातव यांनी लोकसहभागातून संगणक उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला होता. शाळेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ हा लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविण्यात येत असून, शाळेच्या गरजा समाजाच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा त्यामागील उद्देश आहे. त्याच उपक्रमांतर्गत संगणकाची गरज पूर्ण करण्यात आली.
संगणक उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. डिजिटल युगात संगणक शिक्षण अत्यावश्यक बनले असून, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. डिजिटल साक्षरतेच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत मुख्याध्यापक सातव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उमेश कापरे, श्रद्धा मोहबे, आकाश कदम, अक्षय खामकर, गौतम कांबळे, प्रियंका नाणेकर, रसिका गोडसे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
