पुणे, दि. २२ जुलै (प्रतिनिधी):
ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे मॅनेजर प्रशांत वारघडे आणि बाळासाहेब भोसले यांनी जिल्हा परिषद तसेच पुणे महानगरपालिका शाळांना तब्बल ६७ संगणक संच भेट देत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. “आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकीय शिक्षणाची संधी मिळाल्यास ते जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने स्पर्धा करू शकतील. शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख दीपक गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे संगणक संच जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिका शाळांपर्यंत पोहोचणार असून हजारो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे.
या उपक्रमाचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून दिलेल्या या योगदानाबद्दल शाळांच्या वतीने सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे मॅनेजर प्रशांत वारघडे आणि बाळासाहेब भोसले यांचा हवेली तालुका प्राथमिक शिक्षक क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमन बबन सातव आणि विकास कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी सिनेक्रॉन टेक्नॉलॉजी प्रा. लि.च्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची प्रभावी संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
