अष्टापूर: “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवाद व समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. पालकांनी आपल्या पाल्यांच्या दैनंदिन अभ्यासाकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांना योग्य वेळी आवश्यक ते मार्गदर्शन करावे,” असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूरच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांनी केले.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा शनिवार (दि. २६) रोजी सकाळी उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासाची सद्यस्थिती, अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच आगामी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने विद्यालयाकडून सुरू असलेली तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापिका दीपाली दळवी यांनी पालकांना परीक्षा काळातील अभ्यासाचे नियोजन, विद्यार्थ्यांवरील ताणतणाव आणि त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी गणेश कोतवाल आणि अरविंद कोतवाल यांच्यासह इतर पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
विद्यालयातील सहशिक्षक चौरंगनाथ कामथे, नवनाथ भागवत, सुरेश ओंबळे, बाळासाहेब ढवळे आणि सुहास भुजबळ यांनी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, प्रभावी अभ्यासपद्धती आणि परीक्षेची तयारी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक सुहास भुजबळ यांनी मानले.
पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला अधिक चालना मिळावी आणि आगामी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा पालक मेळावा उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.
