पुणे : हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीकडे तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, दोन प्रमुख पॅनलमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील अनुभवी नेत्यांनी एकत्र येत आपापली राजकीय ताकद पणाला लावली आहे. विशेषतः ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल’ने प्रभावी नेत्यांची मोट बांधत निवडणुकीत आपले आव्हान उभे केले आहे.
प्रकाश मस्के, दिलीप काळभोर, प्रदीप कंद आणि सुरेश घुले यांची एकजूट
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांनी एकत्र येत ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनल’ची स्थापना केली आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, राजकीय संपर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव यांच्या जोरावर या पॅनलने निवडणुकीची तयारी केली आहे.
या पॅनलकडून संस्था प्रतिनिधी प्रवर्गात कल्याण अंकुश शिंदे, संजय सोपान गायकवाड, चैतन्य कैलास जोरी, प्रकाश अमृत सावंत, युवराज पंडितराव कांचन, प्रदीप खंडू आहेर, गुलाब भागुजी चौधरी, बाळासाहेब शिवाजीराव पोकळे, अश्विनी सुखदेव भोरडे आणि तेजस नंदकुमार कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून प्रशांत दत्तात्रय काळभोर, महेंद्र पाटीलबुआ दांगट, मधुकर रामदास घुले आणि शेखर सहदेव मस्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी प्रवर्गातून सुनीता संदीप धुमाळ आणि सुरेखा अनंता भाडळे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच इतर मागास प्रवर्गातून संजय अमृतराव सातव, भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातून मल्हारी दत्तात्रय केसकर आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून सत्यवान दगडू गायकवाड निवडणूक लढवत आहेत.
परिवर्तन पॅनलकडूनही तगडे आव्हान
दरम्यान, या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक विकास दांगट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे हवेली युवक तालुकाध्यक्ष संदीप गोते यांच्या नेतृत्वाखाली ‘अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनल’ही मैदानात उतरले आहे.
या पॅनलकडून संस्था प्रतिनिधी प्रवर्गात रामदास सहादू दांगट, राजेंद्र ज्ञानेश्वर खांदवे, सुभाष सदाशिव टकले, सुभाष ज्ञानोबा कांचन, हनुमंत काळुराम हरगुडे, साईनाथ रामराव वाळके, कृषीराज दत्तात्रय चौधरी, तुषार बापुसो कुटे, राजेंद्र किसन कोंडे आणि शरद गोपाळ भालेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून विराज सुभाषराव काळभोर, प्रविण सुभाष खांदवे, सूर्यकांत दत्तात्रय काळभोर आणि सोमनाथ गोविंद खांदवे निवडणूक लढवत आहेत. महिला प्रतिनिधी प्रवर्गातून कल्पना शिवाजी खटाटे आणि सुशिला राजाराम कदम, इतर मागास प्रवर्गातून भरत दत्तात्रय काळभोर, भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातून भगवान शंकर मडदे, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून विनायक लक्ष्मण कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रातील वर्चस्वाची लढाई; जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडेही लक्ष
दोन्ही पॅनलच्या मागे अनुभवी नेत्यांची ताकद उभी असल्याने या निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या निकालाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रात कोणाचे वर्चस्व निर्माण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आता दोन्ही पॅनलच्या रणनीतीची आणि मतदारांच्या भूमिकेची कसोटी लागणार असून, या प्रतिष्ठेच्या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हवेली तालुका खरेदी-विक्री संघासाठी येत्या शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
