प्रतिनिधी | वाडे बोल्हाई : जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाडे बोल्हाई येथील वरिष्ठ विज्ञान शिक्षक राजेंद्र राऊत यांना पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यातील पद्मावती येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा. डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते राजेंद्र राऊत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राऊत यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
संत तुकाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार मा. बापूसाहेब पठारे, सचिव अॅड. दत्तात्रय काळे, प्राचार्य सतीश धुमाळ, पर्यवेक्षक गणेश फलके तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
