कलकवाडी (प्रतिनिधी):जिल्हा परिषद शाळा कलकवाडी व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २२ जुलै) महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश भाऊ गवारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वर्गीय संभाजी आप्पा गवारे यांच्या तेराव्या विधीनिमित्त शाळेसाठी मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख जाधव साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेशराव श्रीराम, माजी उपसरपंच मंगेश भाऊ गवारे, अमोल लोणारी, शिवप्रसाद कंकरवाल, हरिभाऊ श्रीराम, गणपतराव गायकवाड, सुनीलराव मोडक, अशोक गवारे, सुधीर पिंगळे तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते शालेय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. शाळेच्या प्रांगणात आज लहान-मोठी सुमारे १०० झाडे बहरत असून विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शालेय परिसर अधिक हिरवागार व निसर्गरम्य झाला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांनी शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.
