अष्टापूर (प्रतिनिधी) : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ‘प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यालय प्रशासनाने विशेष तयारी केली होती. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी अष्टापूर येथील उद्योगपती राजेश सुदाम कोतवाल यांनी विद्यालयाला ‘कॅनन’ कंपनीचे झेरॉक्स मशीन भेट दिले. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अनुष्का निकाळजे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला. शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन पुस्तकांचा सुवास आणि कोऱ्या पुस्तकांचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण न आणता विविध मनोरंजक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंददायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या भोजनात विद्यार्थ्यांना विशेष गोड पदार्थ म्हणून ‘बालुशाही’ देण्यात आली.
विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना, “विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शाळा व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचे स्वागत करून नियमित उपस्थिती व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.
या कार्यक्रमास आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे नियामक मंडळ सदस्य रमेश कोतवाल, संस्था व शाळा समन्वयक तथा माजी मुख्याध्यापक सुभाष काळे, शालेय समिती सदस्य तयाजी जगताप, नितीन मेमाने, विजय कोतवाल, दिवाकर पिंगळे, राहुल शामराव कोतवाल, चंद्रकांत कोतवाल, पालक संघाचे अध्यक्ष राहुल पंढरीनाथ कोतवाल, केतन निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी झालेल्या या उत्साहपूर्ण स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी नवचैतन्य आणि आपुलकीची भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी केले.
