थेऊर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे आणि डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हावे या उद्देशाने सिनेक्रोन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, हिंजवडीचे व्यवस्थापक प्रशांत वारघडे यांच्या पुढाकारातून विविध शाळांना ६३ संगणकांचे वाटप करण्यात आले. तसेच आणखी १२ शाळांसाठी २६ संगणक देण्याचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.
हनुमानवाडी, हिंगणगाव, भावरापूर, दासवे वस्ती, बोधे वस्ती, काकडे वस्ती, कोरेगाव मूळ, इनामदार वस्ती फाटके, बोलवाचीवाडी काटवण, टेमघर पुनर्वसन, थेऊर मुरकुटे वस्ती, सावर्डे विकासवाडी, जगतापवाडी, साळोबावस्ती, पिंपरी सांडस व वाघदरा येथील शाळांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
हवेली तालुका शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून मनपा शाळा अनाजीवस्ती येथेही नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी संगणक संच भेट देण्यात आला. मुख्याध्यापक बबन सातव यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासाठी आवश्यक साधनांची कमतरता भासत होती. ही गरज ओळखून प्रशांत वारघडे यांनी संगणक संच उपलब्ध करून दिला.
शाळेत संगणक उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले. माहिती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष धडे घेण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनपा शाळा अनाजीवस्ती येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या पुढाकारातून ‘एक हात मदतीचा’ हा लोकसहभागावर आधारित उपक्रम राबविला जात आहे. शासन आणि प्रशासनावर पूर्णपणे अवलंबून न राहता लोकसहभागातून शाळेच्या गरजा पूर्ण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची संगणकाची गरज पूर्ण करण्यात आली.
“आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आहे. डिजिटल इंडियाच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच संगणक हाताळण्याचे कौशल्य प्राप्त होणे आवश्यक आहे. या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे मत मुख्याध्यापक बबन सातव यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरसेविका सारिकाताई घुले, माजी सरपंच अमित घुले, नगरसेवक डॉ. दादा कोद्रे, माजी सरपंच कमलताई घुले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आवटे, उपाध्यक्ष समा साळवे, समिती सदस्य तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.
