अष्टापूर, (प्रतिनिधी): न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण तसेच वार्षिक निकाल वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली असून ध्वजारोहण श्रीहरीदादा कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच कठोर परिश्रमाची सवय जोपासावी. अभ्यासात सातत्य ठेवल्यास भविष्यात नक्कीच यश मिळवता येते.”
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. सहशिक्षक नवनाथ भागवत यांनी संपूर्ण निकालाचा आढावा सादर करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती दिली.
या प्रसंगी अष्टापूर गावच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संस्थेचे नियामक मंडळ सदस्य रमेशबापू कोतवाल, तसेच स्कूल कमिटीचे सदस्य तयाजी जगताप, विजय कोतवाल, नितीन मेमाणे, दिवाकर पिंगळे आणि संस्था समन्वयक तथा माजी मुख्याध्यापक सुभाष काळे उपस्थित होते.
याशिवाय रामदास कोतवाल, दीपक कोतवाल, नाना कोतवाल, विक्रम कोतवाल, प्रशांत भोरडे, अप्पा जगताप, हनुमंत जगताप, गुंडूराम साळवे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन मेमाणे यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी केले. आपल्या पाल्यांचा निकाल पाहण्यासाठी पालकांनीही विद्यालयात मोठी गर्दी केली होती.
