प्रतिनिधी — आजच्या स्पर्धात्मक युगात तरुण पिढी विविध क्षेत्रांत यश मिळवत असताना आपल्या संस्कृतीशी नाळ जपणारे काही प्रेरणादायी उपक्रमही समोर येत आहेत. अशाच एका हृदयस्पर्शी घटनेने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिंदवणे येथील श्री छत्रपती संभाजी महाराज कुस्ती संकुलातील आखाड्यात सराव करणाऱ्या कु. अर्णवी भाऊसाहेब महाडिक हिने आपल्या आयुष्यातील पहिली कमाई वस्तादाच्या चरणी अर्पण करत गुरू-शिष्य परंपरेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुस्तीच्या माध्यमातून शिंदवणे यात्रेतील आखाड्यात मिळालेली पहिली कमाई गुरूंना अर्पण करत अर्णवीने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. “गुरूंमुळेच मी आज या टप्प्यावर पोहोचले,” असे सांगत तिने हा उपक्रम राबवला. या प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
कुस्ती हा केवळ खेळ नसून शिस्त, मेहनत आणि संस्कार यांचा संगम आहे. आखाड्यातील वस्ताद पै. शरद महाडिक हे शिष्यांना केवळ खेळाचे धडेच देत नाहीत, तर आयुष्य घडवण्याचे संस्कारही देतात. याच परंपरेचा प्रत्यय या घटनेतून आला.
यावेळी आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक, शिंदवणेचे माजी उपसरपंच संभाजी महाडिक, हवेली तालुका शिवसेनेचे माजी उपविभागप्रमुख व संचालक युवराज महाडिक, पत्रकार अमोल महाडिक, सागर नाईकवाडे आदी उपस्थित होते.
गावातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “आजच्या काळात पैशाला जास्त महत्त्व दिले जाते; मात्र अर्णवी महाडिक हिने संस्कार आणि कृतज्ञतेला प्राधान्य दिले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे मत माजी उपसरपंच संभाजी महाडिक यांनी व्यक्त केले.
या प्रेरणादायी कृतीमुळे इतर तरुणांनाही गुरूंचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळत असून, कुस्ती परंपरेतील गुरू-शिष्य नात्याची महती पुन्हा अधोरेखित झाली आहे.
अर्णवी महाडिक ही आदर्श शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांची कन्या असून, शिंदवणे गणेश फेस्टिव्हलमध्ये सलग दोन वर्षे नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिचा सत्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्राताई अजित पवार, अभिनेते संजय खापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर तसेच माजी सरपंच व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला होता.
