प्रतिनिधी : भारतातील लोकशाही व्यवस्थेत पंचायत राज प्रणालीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लोकशाहीचा खरा चेहरा पाहायचा असेल तर तो खेड्यापाड्यात दिसून येतो. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत आणि निवडून आलेले सदस्य गावाच्या विकासासाठी कार्यरत असतात. मात्र शासन आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा अधिकारी म्हणजे ग्रामसेवक. योग्य दृष्टी, प्रामाणिकता आणि गावाच्या विकासाची तळमळ असेल तर एक ग्रामसेवकही गावाचा सर्वांगीण विकास घडवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल मच्छिंद्रनाथ बगाटे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील फुटाणवाडी येथील शेतकरी कुटुंबात अनिल बगाटे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मुंबईच्या गोदीत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील विक्रोळी येथील विकास हायस्कूलमध्ये झाले. आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यानुसार अनिल बगाटे यांनी खंडाळा येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. अॅग्री ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली.
शैक्षणिक गुणवत्तेमुळे त्यांना लवकरच शासकीय सेवेत संधी मिळाली आणि 2004 साली ग्रामसेवक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्यातील मुरबाडसारख्या दुर्गम तालुक्यात त्यांनी काम सुरू केले. त्या काळात गाव विकासापासून बऱ्यापैकी दूर होते. मात्र ग्रामस्थांचा विश्वास जिंकत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाचा विकास हळूहळू दिसू लागला. महिला बचत गटांचे प्रभावी जाळे उभारल्याबद्दल 2005, 2006 आणि 2007 या सलग तीन वर्षांत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने त्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. तसेच ठाणे जिल्हा परिषदेनेही त्यांना उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्काराने गौरविले.
सन 2009 मध्ये त्यांची बदली पुणे जिल्ह्यात झाली. खडकवासला परिसरातील खानापूर, त्यानंतर फुलगाव आणि वढू खुर्द या गावांमध्ये त्यांनी विकासकामांना गती दिली. गावाच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून काम करण्याची त्यांची पद्धत राज्यभरात आदर्श मानली जाते. “आमचा गाव, आमचा विकास” या संकल्पनेतून त्यांनी तयार केलेले ग्रामविकासाचे मॉडेल आज महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
वाडेबोल्हाई गावात कार्यरत असताना सरपंच दीपक गावडे यांच्या सहकार्याने त्यांनी विविध विकासकामे राबवली. या कामाची दखल घेत सरपंच दीपक गावडे यांनाही ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार मिळाला. तंटामुक्त गाव संकल्पना राबवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कोरोना महामारीच्या काळात 2019–20 दरम्यान वाडेबोल्हाईसारख्या मोठ्या गावात प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात ठेवण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
ग्रामपंचायत प्रशासनातील अनुभवाच्या जोरावर त्यांना राज्यस्तरीय काम करण्याची संधीही मिळाली. यशदा (YASHADA) या प्रशिक्षण संस्थेत त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनासंबंधी प्रशिक्षण देण्याचे काम केले. तसेच भारतासाठी पंचायत विकास निर्देशांक तयार करण्याच्या प्रक्रियेतही त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले. याशिवाय पंचायतराज मंत्रालयाच्या ‘समर्थ पंचायत पोर्टल’ आणि ग्रामपंचायतींच्या विविध नमुना प्रणाली तयार करण्यासाठी गठित समितीतही त्यांचा सहभाग होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठीही त्यांनी राज्य शासनाला मार्गदर्शन केले.
सध्या ग्रामसेवक संघटनेत जिल्हा सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविणे, विकास आराखडे तयार करणे आणि प्रशासन अधिक सक्षम करणे या क्षेत्रात ते सातत्याने काम करत आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाकडून सन 2019–20 चा ‘राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या यशाचे श्रेय ते आपल्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाला देतात.
भविष्यातही ग्रामपंचायतींच्या विकासासाठी आणि ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
