अष्टापूर, प्रतिनिधी : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश School, अष्टापूर (ता. हवेली) येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या नावलौकिकात मानाची भर घातली आहे.
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत काजल महेंद्र शेवाळे हिने २७२ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. राजनंदिनी नवनाथ जगताप हिने १४४ गुण, तर श्रावणी नारायण लोले हिने १३४ गुण मिळवून यश संपादन केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कृती सागर पवार, संयुक्ता महेंद्र धारणे आणि साहिल नवनाथ कऱ्हे यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा गौरव वाढविला.
एनएमएमएस परीक्षा २०२६ मध्ये श्रावणी सावंत, सोहम कोंडे आणि गौरी वैरागळ यांनी यश मिळवून विद्यालयाच्या यशात आणखी भर घातली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी केलेल्या परिश्रमामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, शाळा समिती, सल्लागार समिती, पालक संघ, माजी विद्यार्थी संघ तसेच अष्टापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
