पुणे :हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने दणदणीत विजय मिळवत सहकार क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १९ जागांपैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळवत विकास पॅनेलने एकहाती बहुमत प्राप्त केले, तर प्रतिस्पर्धी अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनेलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.
संस्था प्रतिनिधी गटातील १० जागांपैकी ७ जागांवर विकास पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर वैयक्तिक सभासद प्रतिनिधी गटातील ४, महिला प्रतिनिधी गटातील २ आणि इतर मागास प्रवर्ग, भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एका जागेवर विकास पॅनेलने बाजी मारली.
या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले होते. दोन्ही पॅनेलमध्ये प्रतिष्ठेची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मतदारांनी विकास पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल देत विरोधी पॅनेलला मोठा धक्का दिला.
प्रकाश मस्के, दिलीप काळभोर, प्रदीप कंद आणि सुरेश घुले यांची एकजूट ठरली निर्णायक!
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसी बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश घुले यांनी एकत्र येत ‘सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेल’ची स्थापना केली. या अनुभवी नेत्यांच्या एकजुटीमुळे निवडणुकीत विकास पॅनेलची ताकद वाढली. सर्व नेत्यांनी एकत्रितपणे केलेले नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि मतदारांशी साधलेला संपर्क यामुळे पॅनेलला मोठे यश मिळाले.
संदीप आप्पा भोंडवे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान
क्रीडा प्रशासन, राजकारण आणि उद्योजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले संदीप आप्पा भोंडवे यांचे नावही या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत राहिले. ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या प्रशासकीय अनुभवामुळे त्यांची तालुक्यात स्वतंत्र ओळख आहे.
विकास पॅनेलच्या तीन उमेदवारांना पराभवाचा सामना
या निवडणुकीत सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे प्रदीप खंडू आहिरे, तेजस नंदकुमार कोकाटे आणि चैतन्य कैलास जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर परिवर्तन पॅनेलचे कृषीराज ऊर्फ मनोज चौधरी, राजेंद्र खांदवे आणि तुषार कुटे यांनी विजय मिळवला.
सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार
संस्था प्रतिनिधी : कल्याण अंकुश शिंदे, संजय सोपान गायकवाड, प्रकाश अमृत सावंत, युवराज पंडितराव कांचन, गुलाब भागुजी चौधरी, बाळासाहेब शिवाजीराव पोकळे, अश्विनी सुखदेव भोरडे.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी : प्रशांत दत्तात्रय काळभोर, महेंद्र पाटीलबुआ दांगट, मधुकर रामदास घुले, शेखर सहदेव मस्के.
महिला प्रतिनिधी : सुनीता संदीप धुमाळ, सुरेखा अनंता भाडळे.
इतर मागास प्रवर्ग : संजय अमृतराव सातव.
भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : मल्हारी दत्तात्रय केसकर.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : सत्यवान दगडू गायकवाड.
मतदारांच्या विश्वासाला विकासकामांतून उत्तर देण्याचे आव्हान!
या निवडणुकीतील घवघवीत यशामुळे सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलने हवेली तालुक्यातील सहकार क्षेत्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. दिग्गज नेत्यांची एकजूट आणि मतदारांनी दिलेला भक्कम पाठिंबा यामुळे पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता या विजयाचे रूपांतर शेतकरी आणि सभासदांच्या हिताच्या कामांमध्ये करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित संचालकांवर असणार आहे.
हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा, पारदर्शक कारभार आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित संचालक मंडळासमोर असेल. त्यामुळे या निवडणुकीतील विजयापेक्षा आगामी काळात संघाच्या माध्यमातून होणारे कामकाज अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
