अष्टापूर : शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या हवेली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा २०२६-२७ मध्ये आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूरच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक पदके व क्रमांक पटकावले.
या स्पर्धेत चैत्राली पोपट कोतवाल हिने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. अनुश्री आनंदा कोकरे हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा दत्तात्रेय कोतवाल हिने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक, तेजस्वी बापूसाहेब थोरात हिने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक, तर प्रिया अविनाश जगताप हिने लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच अबोली अनिल लोणारी हिने तीन किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. सार्थक रवींद्र कोतवाल याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलांच्या ४×१०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या यशात भर घातली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुरेश ओंबळे, मुख्याध्यापिका दीपाली दळवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे अध्यक्ष विजयराव कोलते, सचिव शांताराम पोमण, सहसचिव गौरव कोलते, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, संचालक शामराव कोतवाल, नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, उद्योगपती राजेश कोतवाल, स्कूल कमिटीचे सदस्य तयाजी जगताप, विजय कोतवाल, नितीन मेमाणे यांच्यासह गावातील मान्यवर, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूरच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला नवे बळ मिळाले असून, आगामी स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्तुंग कामगिरी करावी, यासाठी मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
