पुणे : महानगरपालिका अनाजी वस्ती शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. आझाद नारी फाउंडेशन व ग्रीनसोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील तब्बल 236 विद्यार्थ्यांना दप्तर, मॅट व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नगरसेविका तसेच शिक्षण समिती सदस्य सारिका अमित घुले यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमास पर्यवेक्षिका मोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी अनाजी वस्ती शाळेचा उल्लेख दर्जेदार लोकसहभाग मिळवणारी तसेच “सुपर निपुण शाळा” म्हणून नावारूपाला आलेली संस्था असा केला. तसेच “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत विभागातील शाळा आघाडीवर असून शाश्वत विकासावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले शैक्षणिक कौशल्य विशेष लक्षवेधी ठरले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ओघवते वाचन, तिसरीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचनातील अस्खलितपणा आणि सामान्य ज्ञानाची उत्तम तयारी पाहून सारिका घुले यांनी शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
आपल्या मनोगतात सारिका घुले म्हणाल्या की, “शिक्षण हेच एक असे साधन आहे जे गरिबाला श्रीमंत आणि सामान्याला असामान्य बनवू शकते. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे हे साहित्य केवळ वापरण्यासाठी नसून जपून त्यातून शिकत यश मिळवण्यासाठी आहे.” त्यांनी शाळांमध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि भौतिक सुविधा स्वयंपूर्ण असण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आवटे यांनी “ज्यांचे दप्तर भरलेले असते त्यांचे भविष्य उज्ज्वल असते” असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात सातव सर यांनी आझाद नारी फाउंडेशन व ग्रीनसोल फाउंडेशन यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश कापरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय खामकर यांनी मानले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रेणुका वाघमारे, ज्योती पवार, राधिका भंडारी, शिवकन्या सोळंके तसेच शिक्षक प्रियंका चव्हाण आणि श्रद्धा मोहबे उपस्थित होते.
