प्रतिनिधी :मनपा शाळा अनाजी वस्ती व मनपा शाळा घुले वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी कै. विठ्ठलराव तुपे सभागृहात उत्साहात पार पडला.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हडपसर विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती लीला मोरे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्ग एक अधिकारी पदावर नियुक्त झालेले महेश शिंदे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती माता, स्वराज्य जननी जिजामाता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने श्रीमती श्रद्धा मोहबे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवनियुक्त शिक्षक गौतम कांबळे, रसिका गोडसे व दक्षा बुट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातव यांनी केले. अध्यक्षीय भाषणात लीला मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे महेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला व छंद जोपासावेत, असे मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आवटे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात स्नेहसंमेलनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मांजरी गावाच्या माजी सरपंच कमलताई घुले, पोलीस पाटील अमोल भोसले, संमती बालनिकेतनचे अधीक्षक प्रताप चिंचोले, घुले वस्ती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पारे, दोन्ही शाळांचे व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कांबळे व दीपा थोरात यांनी केले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी प्रियंका चव्हाण-नाणेकर, अक्षय खामकर, आकाश कदम, उमेश कापरे, पल्लवी कांबळे, गुलशन शेख व अश्विनी राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी घुले वस्ती शाळेचे मुख्याध्यापक आव्हाड यांनी आभार मानले.
