महावितरण कंपनीने शेतीपंपांसाठी लागणारे वीज कनेक्शन लाईटवरून (पारंपरिक वीजपुरवठ्यावरून) देणे बंद केले आहे. मात्र, महाबळेश्वरसारख्या थंडगार वातावरण असलेल्या भागांमध्ये हिवाळा व पावसाळ्याच्या काळात सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांना आवश्यक तितका दाब मिळत नाही.
या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीपासून किमान दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. अशा ठिकाणी पाणी पोहोचवण्यासाठी १० एचपी किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या पंपाची आवश्यकता असते. सोलर ऊर्जेवर हे पंप पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने पाणी शेतापर्यंत पोहोचवणे शक्य होत नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गाने महावितरण कंपनीकडे मागणी केली आहे की, ५ एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या पंपांसाठी पुन्हा एकदा महावितरणच्या लाईटवरून वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करावी. यामुळे शेतीला आवश्यक पाणीपुरवठा सुरळीत होईल आणि उत्पादनात वाढ होईल, असे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
