थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (ता. २८) रोजी कोलवडी (ता. हवेली) येथील लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालयात अभूतपूर्व गोंधळात संपन्न झाली. कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत, काही सभासदांनी आपले विषय मांडण्याचा प्रयत्न करत असताना गोंधळ निर्माण झाला. अखेरीस, कारखान्याचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रकासह सहा विषय संचालक मंडळाने गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले.
मागील काही दिवसांपासून कारखान्याच्या जमीन विक्री संदर्भातील घडामोडींमुळे या सभेबाबत सभासदांमध्ये मोठी उत्सुकता होती. शासनाच्या आदेशानंतर, कारखान्याची जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला २९९ कोटी रुपयांना विकण्याचा व्यवहार निश्चित झाला आहे. या रकमेतून शेतकरी, कामगार व इतर देणी देऊन कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, बाजार समितीच्या काही संचालकांनी शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करूनच जमीन विक्री प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश दिल्याने सभासदांचे लक्ष या सभेवर लागले होते.
नामकरण 'श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना'
यशवंत सहकारी साखर कारखान्याचे नामकरण करून "श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना" असे करण्यात आल्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी जाहीर केले. या नामकरणाला शासन मान्यता मिळाली असून, सभासदांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
सभेची सुरुवात अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या मनोगताने झाली. जगताप यांनी गेल्या १३-१४ वर्षांतील सर्व घडामोडींचा आढावा घेतला आणि कारखान्याच्या हितासाठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. विशेषतः माजी संचालक पांडुरंग काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यामुळेच सध्याचे संचालक मंडळ कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की, सभासदांच्या हिताचा विचार करून यशवंत कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संचालक मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे, माजी कृषिमंत्री शरद पवार आणि आमदारांशी संवाद साधून हा निर्णय घेतला. संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातील जवळपास १०५ कोटी रुपये वाचवले असून, बँकांची देणी ‘वन टाइम सेटलमेंट’ (OTS) नुसार दिल्याने कारखान्याची सर्व जमीन आता मोकळी झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षांच्या मनोगतानंतर कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यांनी एक-एक विषय वाचून मंजुरीसाठी मांडला. याचवेळी, विषय पत्रिकेव्यतिरिक्त काही माजी संचालकांनी कारखान्याच्या मालकीच्या ९९.२७ एकर जमीन विक्रीचा विषय छेडला, तर विकास लवांडे यांनी सभेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावर विशाल हरपळे यांनी, “आम्ही कोणाला घाबरत नाही. प्रत्येक जण शेतकरी आहे आणि त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मला दहा मिनिटे बोलायचे आहे. कारखाना सुरू करण्याच्या उद्देशाने भांडायचे आहे. कामगार आणि सभासदांची देणी कधी मिळणार? यावर विषय मांडा. पण, सभा मोडीत काढण्याचा प्रयत्न कुणीही करू नका. तसे केल्यास शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होईल,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, सभेत गोंधळाचे वातावरण वाढत गेल्याने कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून उपस्थितांना ठराव मंजूर आहेत का? अशी विचारणा केली. यावर उपस्थित सभासदांनी ‘सहाही ठराव मंजूर’ अशा घोषणा देत हात वर करून सर्व विषय मंजूर असल्याचे सांगितले. या गोंधळातच संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली आणि राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राजेंद्र खांदवे, रोहिदास उंद्रे, कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे तसेच संचालक सुनील कांचन, संतोष कांचन, राहुल घुले, योगेश काळभोर, सुशांत दरेकर, विजय चौधरी, शशिकांत चौधरी, ताराचंद कोलते, नवनाथ काकडे, सागर काळभोर, रामदास गायकवाड, शामराव कोतवाल, प्रताप गायकवाड, रमेश गोते, हेमलता काळभोर, रत्नाबाई काळभोर, दिलीप शिंदे, मोहन म्हेत्रे, कुंडलिक थोरात यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोणीकंद पोलिसांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सभेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.