मनपा शाळा अनाजीवस्ती येथे सामाजिक बांधिलकी जपत शुभम लुनावत व मित्रपरिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसांत स्वेटर वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हिवाळ्यात उब मिळण्यासोबतच मायेचा स्पर्शही लाभला.
यावेळी शालेय विकासाला चालना देण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी शाळेसाठी इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड आणि संगणक देण्याचे आश्वासनही देण्यात आले. या कार्यक्रमास खराडी–चंदननगर येथील आयटी पार्कमधील त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सोनाली आवटे व समिती सदस्यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातव सर यांनी केले. त्यांनी शाळा गुणवत्ता विकासात आघाडीवर असल्याचे नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शालेय शिस्तीबाबत कौतुकास्पद गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मोहबे मॅडम यांनी मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून सामाजिक सहभागातून शिक्षणाच्या दर्जात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आदर्श घालून देणारा आहे.
