तळेगाव ते आळंदी म्हातोबाची दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा यांची भेट घेऊन आपली ठाम भूमिका मांडली. “विकास आवश्यक आहे, पण स्थानिक भूमिपुत्रांची घरे तोडून आणि त्यांना भूमिहीन करून प्रकल्प लादणे योग्य नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीत त्यांनी पुणे–नाशिक रेल्वे मार्गासंदर्भात जीएमआरटी (GMRT) प्रकल्पाच्या अडथळ्यांविषयीही प्रश्न उपस्थित केला. जगभरात रेडिओ टेलिस्कोप असलेल्या १९ ठिकाणी रेल्वे प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू असताना, केवळ पुणे–नाशिक मार्गावरच GMRT चे कारण पुढे केले जाते, हे समजण्यासारखे नाही, अशी टीका त्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी त्या १९ प्रकल्पांची यादीही महाप्रबंधकांसमोर सादर केली आणि जुन्या डीपीआरनुसारच (Detailed Project Report) हा मार्ग व्हावा, अशी मागणी केली.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करता, पुणे–दौंड मार्गावर रेल्वे प्रवासी वाहतुकीस उपनगरीय दर्जा देण्याची गरजही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी’साठी (Comprehensive Mobility Plan) मेट्रो, रेल्वे व रस्ते वाहतूक यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. “कोणताही प्रकल्प लावताना लोकांच्या हक्कांची पायमल्ली न होता, त्यांच्या सहमतीने आणि विश्वासाने तो राबविणे हीच खरी लोकशाही,” असे स्पष्ट मत डॉ. कोल्हे यांनी मांडले.