गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) गट आरक्षणाच्या दरांमध्ये ३० टक्के वाढ केली आहे. या वाढीमुळे कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्त प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गट आरक्षण म्हणजे ४० किंवा त्याहून अधिक प्रवाशांसाठी एकत्रितपणे बस आरक्षित करण्याची सोय. यामध्ये पूर्वी सवलतीच्या दरात आरक्षण मिळत असे. मात्र आता, एकाच बाजूस (one-way) प्रवासासाठी ३०% वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. ही नवी दररचना २२ जुलै २०२५ पासून लागू झाली आहे.
एसटी प्रशासनानुसार, ही वाढ केवळ एकेरी प्रवासासाठी आहे. सवलतीस पात्र प्रवाशांनाही आता वाढीव दरानुसार तिकीट घ्यावे लागणार असून, सवलतीची रक्कम सरकारकडून भरपाई स्वरूपात दिली जाईल. मात्र, सामान शुल्क, आरक्षण शुल्क आणि अपघात सहाय्यता निधी यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
प्रवाशांचा विरोध:
कोकण प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की,
“गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एसटी महामंडळाने ५,००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी भाडेवाढ अन्यायकारक आहे. हा निर्णय प्रवाशांच्या खिशावर मार आहे आणि शासनाने यावर पुनर्विचार करावा.”