राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर महत्त्वाचे विधान केले आहे. नाशिकमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना पवार म्हणाले की, “आज महाराष्ट्रासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोणतीही किंमत मोजून महाराष्ट्र एकसंघ कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू.”
राज्यातील गावागावांमध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी हे वक्तव्य केले. नांदेड येथील एका शिक्षण संस्थाचालकाने मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने त्यांच्या संस्थेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन मराठा समाजाने केले होते, अशा घटनांमुळे राज्याचा सामाजिक समतोल ढासळत असल्याचे चित्र दिसत आहे.
याच कार्यक्रमात शरद पवार यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या कार्याचे स्मरण केले. गायकवाड यांचे जीवनकार्य कसे सामाजिक सलोखा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीशी जोडलेले होते हे त्यांनी सांगितले. गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतचा राजकीय प्रवास, त्यांनी केलेल्या सामाजिक चळवळी आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी दिलेले योगदान यावर पवारांनी प्रकाश टाकला. राज्याच्या विकासासाठी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीचा पाया घालण्यातही दादासाहेबांची भूमिका महत्त्वाची होती, असेही त्यांनी नमूद केले.
पवार म्हणाले की, आज महाराष्ट्राची सामाजिक एकजूट धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत दादासाहेब गायकवाड यांच्यासारख्या नेत्यांचे कार्य अधिक महत्त्वाचे ठरते. सामाजिक ऐक्य आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.