ओडिशा लवकरच देशातील नवे ‘गोल्ड हब’ बनण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (GSI) संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ओडिशाच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आढळून आले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, हे साठे सुमारे १०० ते २०० मेट्रिक टन (म्हणजेच १,००,००० ते २,००,००० किलो) इतके असू शकतात.
ही माहिती समोर आल्यानंतर ओडिशा विधानसभेत राज्याचे खाण मंत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप ही आकडेवारी अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आलेली नसली तरी या शोधामुळे देशांतर्गत सोन्याच्या खाण उद्योगाला नवे बळ मिळू शकते.
सोन्याचे साठे कुठे सापडले?
देवगड (आदासा-रामपल्ली), सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट या जिल्ह्यांमध्ये हे साठे सापडले आहेत. याशिवाय, मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूर आणि बौद्ध जिल्ह्यांमध्येही सोन्याचा शोध सुरू आहे.
भारताची सोन्यावरील अवलंबनता
भारत दरवर्षी सुमारे ७००-८०० मेट्रिक टन सोनं आयात करतो. त्याच्या तुलनेत देशांतर्गत उत्पादन अत्यल्प असून, २०२० पर्यंत फक्त १.६ टन इतकं सोने देशात तयार केलं जात होतं. अशा परिस्थितीत, ओडिशामध्ये सापडलेला हा साठा भारताच्या एकूण गरजा भागवू शकत नसला तरीही देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने तो एक मोठा टप्पा ठरू शकतो.