आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर (हवेली) विद्यालयामध्ये आदर्श शिक्षक सुरेश भालचंद्र देशपांडे यांच्या २८ वर्षांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव समारंभ पार पडला. मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या कार्यक्रमात सुरेश देशपांडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा ग्रामीण संस्थाचालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय विजय कोलते यांच्या हस्ते मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना विजय कोलते यांनी सुरेश देशपांडे यांच्या शैक्षणिक योगदानाचे कौतुक करताना सांगितले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबरच कला, क्रीडा आणि संस्कृतीसारख्या पूरक क्षेत्रांतही मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.
उपस्थित अनेक मान्यवरांनी सुरेश देशपांडे यांच्या शैक्षणिक सेवांबाबत आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानाबाबत मनोगत व्यक्त करून विशेष कौतुक केले. विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने सुरेश देशपांडे व त्यांच्या पत्नी मंजुषा सुरेश देशपांडे यांना संपूर्ण पोशाख आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले गेले.
अष्टापूर भैरवनाथ प्रसादिक दिंडीचे माजी अध्यक्ष शामराव वारे यांनी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल यांच्या हस्ते मनगटी घड्याळ देऊन सुरेश देशपांडे यांचा गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालय समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल होते, ज्यांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षकांनी उत्तम विद्यार्थी घडवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमात यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांचा शुभ संदेश वाचण्यात आला. याशिवाय गावचे सरपंच पुष्पाताई कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संस्थेचे सहसचिव संदीप टिळेकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेकभोजनाने संपन्न झालेल्या या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौरंगनाथ कामथे यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रदर्शन रमेश जाधव यांनी केले. सुरेश देशपांडे यांनी त्यांच्या २८ वर्षांच्या सेवेसाठी संस्थेचे, पदाधिकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले.