अष्टापुर (ता. हवेली, जि. पुणे) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर येथे नवरात्रोत्सवानिमित्त महाभोंडल्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच सौ. पुष्पाताई सुरेश कोतवाल, श्री. सुरेश दत्तू कोतवाल, मुख्याध्यापक सुभाष काळे आणि महिला शिक्षिकांच्या हस्ते हस्ती पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सुरेश देशपांडे यांनी महाभोंडल्याची पारंपरिक आरती गायली. सहशिक्षिका सविता शितोळे यांनी भोंडल्याची पारंपरिक गाणी सादर केली, तर शिक्षिका छाया कांबळे यांनी विद्यार्थ्यांना या सणाविषयी माहिती दिली. या निमित्ताने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी देवीची गाणी नृत्याद्वारे सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थी ज्ञानराज जगदाळे याने हत्तीचे सुंदर चित्र रेखाटले. त्याच्या या प्रतिभेचे कौतुक करत शाळेच्या वतीने त्याला पेन्सिल बॉक्स आणि खिरापत देण्यात आली. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टिपऱ्यांचा खेळ, नृत्य आणि गाण्यांमधून महाभोंडल्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ. पुष्पाताई कोतवाल व श्री. सुरेश कोतवाल यांनी विद्यार्थिनींना खिरापतीसाठी आर्थिक मदत केली. कार्यक्रमाचे नियोजन सुशीला सातपुते, सुषमा दरेकर, सविता शितोळे, दिपाली गायकवाड, छाया कांबळे, प्रियांका कोतवाल आणि कल्पना तांबे यांनी केले.
सूत्रसंचालन सुषमा दरेकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुशीला सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खिरापतीचे वाटप करण्यात आले.