चेहऱ्यावर सतत होणारे मुरुम, अॅक्ने आणि डाग हे आजच्या जीवनशैलीमुळे सामान्य झाले आहे. विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. बाजारात अनेक फेसवॉश, क्रीम्स, सीरम्स मिळतात पण कायमस्वरूपी समाधान मिळत नाही. अशा वेळी नैसर्गिक उपायांकडे वळण आवश्यक आहे.
त्वचात सुधारणा करणाऱ्या काही सोप्या पण परिणामकारक टिप्स आहेत, ज्या नियमित अवलंबल्यास स्वच्छ, तेजस्वी आणि मुरुममुक्त त्वचा मिळू शकते.
१. आहारात सुधारणा करा – ‘त्वचेचं खूप काही पोटावर अवलंबून’
त्वचेशी संबंधित बहुतेक समस्या आपल्या खाण्यावर आधारित असतात. फास्ट फूड, साखरयुक्त आणि तळलेले पदार्थ यामुळे शरीरात सूज निर्माण होते आणि हार्मोन्स असंतुलित होतात, जे मुरुमांचं मुख्य कारण ठरतं. आहारात फळं, पालेभाज्या, फायबरयुक्त अन्न, आणि भरपूर पाणी यांचा समावेश केल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या स्वच्छ राहते.
२. पुरेशी झोप – ‘ग्लोइंग त्वचेसाठी निद्राही महत्त्वाची’
रोज ७ ते ८ तासांची शांत झोप ही त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. झोप कमी झाली की शरीरातील कोरटिसोल (stress hormone) वाढतो, ज्यामुळे अॅक्नेची शक्यता वाढते. झोपताना त्वचा दुरुस्त होते, मृत पेशींचं पुनर्निर्माण होतं आणि नैसर्गिक तेज टिकून राहतं.
३. स्वच्छता आणि वैयक्तिक हायजीन – ‘छोट्या सवयी, मोठा फरक’
चेहऱ्याला वारंवार हात लावणे, घाणेरड्या टॉवेलचा वापर, उशीचे कव्हर न बदलणे हे सर्व त्वचेला हानिकारक असते. अशा सवयी मुरुमंना निमंत्रण देतात. म्हणूनच चेहरा धुतल्यावर स्वच्छ टॉवेल वापरा, उशीचे कव्हर आठवड्यातून किमान दोनदा बदला आणि शक्यतो हात चेहऱ्यापासून दूर ठेवा.
४. सनस्क्रीनचा वापर – ‘सूर्यप्रकाशाचा परिणाम त्वचेवर होतो’
उन्हात सनस्क्रीन न वापरता बाहेर पडल्यास त्वचेवर काळे डाग, सनटॅन आणि अॅक्ने वाढू शकतात. त्वचेचा प्रकार लक्षात घेऊन ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक सनस्क्रीन वापरणं आवश्यक आहे. घरातून बाहेर पडण्याआधी किमान १५ मिनिटं आधी सनस्क्रीन लावा.
५. नियमित व्यायाम – ‘ताज्या त्वचेसाठी घामही आवश्यक’
रोजचा थोडा व्यायाम – जसे चालणे, योगा, किंवा हलका जॉगिंग – हे त्वचेसाठी अमृतसमान आहे. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, टॉक्सिन्स घामाद्वारे बाहेर टाकले जातात आणि त्वचा ताजीतवानी दिसते. व्यायामामुळे मानसिक ताणही कमी होतो, जो मुरुमांचं एक मुख्य कारण असतो.