प्रतिनिधी:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मूळ गावी निघालेलं एक शिक्षक कुटुंब तब्बल 40 तासांपासून बेपत्ता असल्याने हिंगोली जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आज सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्या कुटुंबाचा अखेर संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखरूप असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात येताच नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
नेमकं काय घडलं?
हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे शिक्षक सध्या नोकरीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास आहेत. गणपती सणाच्या निमित्ताने हे चौघेही कारने आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे रवाना झाले होते. मात्र ठरलेल्या वेळेत ते घरी पोहोचले नाहीत आणि त्यांच्या सर्व मोबाईल फोनना संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले, तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मोबाईल फोन गेल्या 40 तासांपासून बंद असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये मोठी चिंता पसरली होती. त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कालपासून त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांनी प्रयत्न सुरू केले होते.
अखेर बेपत्ता कुटुंबाचा संपर्क झाला
आज सकाळी 9:50 वाजता ज्ञानेश्वर चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते सर्वजण सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात मुक्कामी होते. त्यांच्याशी संपर्क होताच, नातेवाईकांनी मोठा सुटकेचा श्वास घेतला आहे. मात्र, त्यांचा मोबाईल इतक्या वेळ बंद का होता? ते संपर्कात का नव्हते? हे महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. कुटुंब सुरक्षित असले तरी त्यांच्या अचानक गायब होण्यामागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.