प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या मनपा शाळा अनाजीवस्ती, मांजरी बुद्रुक येथे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला नगरसेवक डॉ. दादा कोद्रे, नगरसेवक अजित आबा घुले, नगरसेविका सारिकाताई घुले आणि नगरसेविका नंदाताई आबनावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सभेदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मान्यवरांनी कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. दादा कोद्रे यांनी शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक उंचावावी, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान इतर विद्यार्थ्यांसमोर केल्यास त्यातून प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले. अजित आबा घुले यांनी डिजिटल साधनांचा वापर करून अध्यापन केल्यास ते अधिक प्रभावी ठरेल व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे सांगितले.
सारिकाताई घुले यांनी शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली. शाळेच्या विकासासाठी सातत्याने योगदान देण्यास आपण तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले. नंदाताई आबनावे यांनीही शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, तसेच शाळांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन दिले.
सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बबन सातव सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाचा पाया भक्कम भौतिक सुविधांवर अवलंबून असतो, असे त्यांनी नमूद केले. मान्यवरांच्या सहकार्याने दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध करून शाळेचा विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांनी परिसरातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. लोकसहभागातून शाळांचा भौतिक विकास शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीदरम्यान मुख्याध्यापकांशी सुसंवाद साधत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले.
या बैठकीस परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनाली आवटे व सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा मुगलमुगले यांनी केले.
