मांजरी बुद्रुक:विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समितीच्या माध्यमातून मनपा शाळा आणि अनाजीवस्ती परिसराचा चेहरा बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी आयोजित सभेचे आयोजन मा. सरपंच कमलताई घुले आणि मा. उपसरपंच अमित आबा घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
सभेला मांजरी गावचे पोलीस पाटील अमोल भोसले, डॉक्टर स्नेहल टेके, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आवटे, उपाध्यक्षा समा साळवे तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
सभेत मान्यवरांच्या हस्ते नव्याने नियुक्त झालेल्या सुरक्षा रक्षक सुचिताताई पांडे यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच, अनाजीवस्ती शाळेला दोन वर्गखोल्या स्वखर्चाने बांधून देणाऱ्या समाजकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
भविष्यातील डिजिटल युग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षरता मिळावी म्हणून 15 संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल उपसरपंच अमित आबा घुले यांनी पुढाकार घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि शालेय उपक्रमांसाठी 2,000 स्क्वेअर फुटांचे सभागृह बांधण्याचे आश्वासन त्यांनी सभेत दिले.
मा. सरपंच कमलताई घुले म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास व्हावा यासाठी खेळासाठी जागेची अडचण दूर करून स्वतःची जागा उपलब्ध करून दिली आहे.”
शाळेचे मुख्याध्यापक बबन सातव सर यांनी प्रास्ताविक करून शालेय सुरक्षा आणि गुणवत्ता विकासाबाबत माहिती दिली. पोलीस पाटील अमोल भोसले यांनी शाळेच्या स्वच्छतेबाबत, गुणवत्तेबद्दल आणि शिक्षक राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली आवटे यांनी लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास बदलता येईल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार श्रद्धाताई मोहबे यांनी मानले.
