राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रशासन सतर्क झालं असून, नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
मुंबईतील कांदिवली, अंधेरी, सांताक्रूझ, दादर, गोरेगावसह अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अंधेरी सबवेमध्ये दीड फूट पाणी साचल्यामुळे मार्ग बंद करण्यात आला आहे. लोकल, बस व मोनोरेल सेवेवर परिणाम झाला असून, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दुसरीकडे, पुण्यातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून 2000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होणार असून, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचे आणि जनावरं व वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पावसाचा परिणाम शाळांवरही दिसून आला आहे. पुण्यातील काही शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, मुंबईत सकाळच्या सत्रातील शाळा सुरु झाल्या असल्या तरी, पावसाचा जोर वाढल्यास दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दादरमधील बालमोहन शाळेसह काही शाळांनी विद्यार्थ्यांना लवकर सोडले आहे.
दरम्यान, शासनाने मोठा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान विभागानुसार, ढगाळ वातावरण, विजांच्या गडगडाटासह पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडू नये. नदी पात्र, पुल, ओढे आणि नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. ज्या भागांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित राहावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.