प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या काळात राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विभागानुसार हवामानाचा अंदाज:
- कोकण: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
- मध्य महाराष्ट्र: पुणे, अहमदनगर (अहिल्यानगर), नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह जोरदार पाऊस येऊ शकतो.
- घाटमाथा: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- मराठवाडा: लातूर आणि धाराशिव वगळता जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर, बीड आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
- विदर्भ: विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मुसळधार, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
या अंदाजामुळे गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.