शिंदेवाडी, ता. हवेली: येथील अभिनव मित्र मंडळ संचलित लोकनेते दादा जाधवतराव माध्यमिक विद्यालय, हिंगणगाव-शिंदेवाडी या विद्यालयाने यंदाच्या ५३ व्या हवेली तालुका विज्ञान प्रदर्शनात पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत नववी ते बारावी गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत विद्यालयातील कुशाग्र विद्यार्थी कुमार भावेश लालचंद कुवर आणि तनया विनोद दरेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक श्री. विनायक वडघुले यांचे परिश्रम व प्रभावी मार्गदर्शन मोलाचे ठरले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र पानसरे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विकास लवांडे साहेब यांनीही शालेय टीमच्या सलग तिसऱ्या विजयाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त केला.
या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल झाले असून स्थानिक पातळीवर सर्वत्र विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
