भारत आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीने मोठे पाऊल उचलले आहे. भारत आता शेजारील फिलिपिन्स देशाला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची तिसरी खेप देणार आहे. या निर्णयामुळे दक्षिण-चीन सागर क्षेत्रातील सामरिक परिस्थिती अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
भारत आणि फिलिपिन्स यांच्यात २०२२ मध्ये सुमारे ३७५ मिलियन डॉलर्सचा करार झाला होता. या कराराअंतर्गत भारताने फिलिपिन्सला क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्याची जबाबदारी घेतली होती. याआधी दोन खेपा दिल्या गेल्या असून तिसरी खेप रवाना करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू आहे.
ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी जयतीर्थ जोशी यांनी सांगितले की क्षेपणास्त्र तयार असून वेळेवर ती फिलिपिन्सपर्यंत पोहोचवली जातील. भारत आपल्या करारातील बांधिलकी पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फिलिपिन्स या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर मुख्यतः किनारी संरक्षणासाठी करणार आहे. दक्षिण-चीन सागरातील अनेक भागांवर चीनने आपला दावा सांगितला आहे, त्यामुळे या क्षेपणास्त्र प्रणालीमुळे फिलिपिन्सच्या सुरक्षेला बळकटी मिळेल.
या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रभाव पडू शकतो. चीन आणि भारत यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिकेने आधीच या भागात आपले लक्ष केंद्रित केले असल्याने दक्षिण-चीन सागरातील सामरिक समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.