नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतचोरी आणि मतदार यादीतील अनियमिततेचे गंभीर आरोप केल्यानंतर, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी रविवारी त्यावर ठाम प्रत्युत्तर दिले. त्यांनी राहुल गांधींच्या सर्व आरोपांना “बिनबुडाचे” आणि “राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत दावा केला होता की, महाराष्ट्रातील निवडणुकांदरम्यान एका विशिष्ट यंत्रणेमार्फत नव्याने १ कोटी मतदारांची नावे मतदार यादीत जोडली गेली, आणि याचा फायदा सत्ताधारी पक्षाला झाला. मात्र, यावर बोलताना आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “निकाल लागल्यानंतरच आक्षेप घेणे कितपत योग्य आहे? मसुदा यादी प्रसिद्ध केल्यानंतर कोणताही आक्षेप किंवा तक्रार दाखल झाली नाही. मग आता हा मुद्दा कशासाठी?”
ते पुढे म्हणाले, “कोणी कितीही वेळा एक गोष्ट सांगितली, तरी ती सत्य ठरत नाही. सूर्य पूर्वेकडेच उगवतो, हे एकच सत्य आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून, प्रत्येक टप्प्यावर सर्व पक्षांना समान माहिती पुरवली जाते.
ज्ञानेश कुमार यांनी याकडे लक्ष वेधले की, गेल्या ८ महिन्यांत एकही तक्रार सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली नाही. याशिवाय, कोणत्याही पक्षाने अधिकृतरित्या आयोगाकडे आक्षेप नोंदवलेला नाही.
त्यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले की, “जर कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते ७ दिवसांच्या आत निवडणूक आयोगासमोर सादर करावेत. अन्यथा, यापुढील कारवाई कायदेशीर स्वरूपाची असेल.”