मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या ‘हैदराबाद गॅझेट’वर मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर मोठा परिणाम होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. या निर्णयाविरोधात आता संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीने रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.
यावर अधिक बोलताना ते म्हणाले की, हैदराबाद गॅझेटमधील शब्दरचना ओबीसी समाजासाठी अडचणीची ठरू शकते. तसेच, गावागावात आंदोलने होत असून, आता ओबीसी समाजाच्या सर्व ३७४ जाती एकत्र येऊन राज्यभर आंदोलन करतील, असे त्यांनी सांगितले.
भुजबळ यांनी यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. “आता सगळे त्यांचेच राज्य आहे. त्यांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या जीआरविरोधात लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याच विषयावर मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर येथे सकल ओबीसी संघटनांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध करण्याचे ठरवण्यात आले. तसेच, जीआरविरोधात कोर्टात आणि रस्त्यावर लढण्यासाठी पुढील कृती आराखडा तयार करण्यात आला.