अष्टापूर :आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथील विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हास्तरीय शालेय भजन गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ही स्पर्धा विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाई (ता. शिरूर) यांच्या वतीने सोमवार, दि. 22 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
या यशाच्या पार्श्वभूमीवर अष्टापूर ग्रामस्थांच्या वतीने विजेत्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, भैरवनाथ प्रसादिक दिंडीचे माजी अध्यक्ष शामराव वारे, अष्टापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष सुरेश कोतवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शामराव वारे यांनी विजेत्या संघाला पाच हजार रुपये, तर सुरेश कोतवाल यांनी अकराशे रुपये रोख बक्षीस दिले. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संगीत आणि अभंगांची गोडी निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे प्रतिपादन करत श्रीहरी कोतवाल यांनी विद्यार्थ्यांना गायन व वादनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले.
गावातील दानशूर उद्योगपती राजेश कोतवाल आणि शामराव वारे यांच्या प्रयत्नातून मागील वर्षभर विद्यालयात संगीत शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सक्षम प्रशिक्षण मिळत आहे.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, नियामक मंडळ सदस्य रमेश कोतवाल, अष्टापूरच्या सरपंच पुष्पाताई कोतवाल, स्कूल कमिटी सदस्य नितीन मेमाणे, तयाजी जगताप, विजय कोतवाल, उपसरपंच संजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल आदी मान्यवरांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भजन संघाला विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले, सूत्रसंचालन सहशिक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुशीला सातपुते यांनी मानले.
