आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2025) संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात भारताचा युवा सलामी फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग (run-chase) करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईचा संघ अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. भारताच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेकने हैदर अलीच्या गोलंदाजीवर जोरदार षटकार लगावला.
अभिषेकने अवघ्या १६ चेंडूत ३० धावांची जलद खेळी साकारली, ज्यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे भारताने हे लहान लक्ष्य ४.३ षटकांत ९ गडी राखून सहज पूर्ण केले. अभिषेकच्या या विक्रमी कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. याआधी रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी T20I च्या पहिल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकले आहेत, मात्र धावांचा पाठलाग करताना असा विक्रम करणारा अभिषेक शर्मा हा पहिलाच भारतीय आहे.