राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा सातवा हप्ता वितरित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका क्लिकवर राज्यातील पात्र ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८९२.६१ कोटी रुपयांचा निधी थेट जमा करण्यात आला आहे.
ही रक्कम एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात २,००० रुपये जमा झाले आहेत. या योजनेनुसार, केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेतील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात, त्यात राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेद्वारे आणखी ६,००० रुपये देत आहे. अशाप्रकारे, शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते.
काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये या हप्त्याबाबत संभ्रम होता, ही योजना बंद झाली की काय अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र, राज्य सरकारने आता निधी वितरित करून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, त्यांना शेतीकामांसाठी यातून मोठी मदत होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचे सरकारने म्हटले आहे.