केरळ राज्यात अमिबिक मेनिंजोएन्सेफलायटिस (Amoebic Meningoencephalitis) या दुर्मिळ पण गंभीर मेंदूच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी या आजाराने आत्तापर्यंत सात लोकांचा बळी घेतला आहे.
हा आजार ‘नेग्लेरिया फॉवलेरी’ (Naegleria fowleri) नावाच्या एका धोकादायक अमीबामुळे होतो, ज्याला ‘मेंदू खाणारा अमिबा’ (brain-eating amoeba) म्हणूनही ओळखले जाते. हा अमिबा दूषित पाण्यात, विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, पोहताना किंवा अंघोळ करताना नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो.
बाधितांची वाढती संख्या
या वर्षी केरळमध्ये या आजाराची 42 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात बहुतांश रुग्ण कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमधील आहेत. या सात मृतांपैकी चार मृत्यू एकट्या कोझिकोड जिल्ह्यात झाले आहेत, ज्यात एका तीन महिन्यांच्या बाळाचा आणि एका नऊ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
वायनाड जिल्ह्यातील 45 वर्षीय व्यक्तीचा अलीकडेच याच आजाराने मृत्यू झाला. तर, कासारगोड जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे आणि 11 इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाची पाऊले
या आजाराचा वाढता धोका लक्षात घेता, आरोग्य प्रशासनाने बाधित जिल्ह्यांमधील तलाव, विहिरी आणि इतर पाण्याच्या स्रोतांची तपासणी वाढवली आहे. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी अतिरिक्त तपासणी उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दूषित पाण्यात जाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.