प्रतिनिधी: परदेशात भारतीयांविरुद्धच्या वंशभेदी घटनांमध्ये वाढ होत आहे. अलीकडेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशा दोन घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे जगभरातील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
इंग्लंडमध्ये शीख टॅक्सी चालकांना मारहाण
इंग्लंडमधील वॉल्व्हरहॅम्प्टन रेल्वे स्टेशनबाहेर दोन वृद्ध शीख टॅक्सी चालकांना मारहाण झाली. सतनाम सिंग आणि जसबीर संगा अशी त्यांची नावे आहेत. तीन हल्लेखोरांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांची पगडीसुद्धा काढली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली, पण नंतर त्यांना जामिनावर सोडले. या घटनेमुळे स्थानिक भारतीय समुदायामध्ये संतापाची लाट पसरली आहे.
ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या महापौरांचा राजीनामा
ऑस्ट्रेलियन शहर मेरीबर्नॉन्गचे भारतीय वंशाचे महापौर प्रदीप तिवारी यांनी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे आपल्या पदाचा तात्पुरता राजीनामा दिला आहे. त्यांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आरोप आहे.
त्यांनी राजीनामा दिल्यानंतर इंटरनेटवर त्यांना आणि संपूर्ण भारतीय समुदायाला लक्ष्य करून वंशभेदी टिप्पण्या (racial comments) करण्यात आल्या. तिवारी यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “माझ्यासाठी हे समजणे खूप कठीण आहे की संपूर्ण भारतीय समुदायाला अशा टिप्पण्यांद्वारे अपमानित का केले जात आहे,” असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले. समाजात वंशवादाला कोणतेही स्थान नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.