प्रतिनिधी: मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्यासाठी ते लाखो मराठा बांधवांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.
भेटीबाबत कोणतीही चर्चा नाही
या चर्चेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्या आणि मंत्री उदय सामंत यांच्यातही याबाबत काहीही बोलणे झालेले नाही.”
‘चर्चेसाठी दोन्ही बाजूंनी समन्वय आवश्यक’
विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, “चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी असली पाहिजे. जर त्यांची तयारी असेल, तर आम्हीही तयार आहोत, मात्र त्यासाठी दोन्ही बाजूंनी समन्वय होणे गरजेचे आहे.” मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांबाबतचा निर्णय जरांगे पाटील यांनी घ्यायचा आहे, त्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा केलेला नव्हता आणि आताही नाही, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईकडे निघालेला मराठा मोर्चा
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांचा मोर्चा अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनाला मनाई केली होती, पण आता त्यांना एका दिवसाची परवानगी मिळाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना, “आम्ही सरकारच्या सर्व अटींचे पालन करू, पण उपोषण बेमुदतच करणार,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 29 ऑगस्ट रोजी हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
